सिल्लोड, (प्रतिनिधी) पालोद फाट्यावर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या कार व दोन दुचाकींना सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने कारम मधील १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. दत्ता शांताराम उघडे (वय १४, रा. पालोद) असे मृत मुलाचे नाव आहे. या अपघातात त्याचे वडील शांताराम महादू उघडे वय ४२ वर्ष व त्यांची आई अनिता शांताराम उघडे वय (४०) हे किरकोळ जखमी झाले.
हा अपघात रविवारी (दि. ४) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पालोद फाट्यावर झाला. कार मधील आई वडील व मुलगा हॉटेलच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून हॉटेल समोर कार मध्ये बसले होते व ते पुढे सिल्लोड कडे जाणारच होते मात्र तेवढ्या वेळेतच ट्रेलर ने त्यांना पाठी मागून धडक दिली. व हा तिहेरी विचित्र अपघात झाला.
अजिंठ्याकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या सिमेंट ट्रेलर क्रमांक एन एल ०१, ए. बी.४०६२ च्या चालकाने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या व्हॅगनार कार (एमएच ०४-डीवाय ३२३८) व उभ्या असलेल्या दोघा दुचाकींना पाठी मागून जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील दत्ता उघडे जागीच ठार झाला.
या अपघातात दत्ताचे आई-वडीलही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिल्लोड येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान दोन्ही दुचाकीस्वार दुचाकी हॉटेल समोर उभी करून हॉटेलमध्ये नाष्टा करत असल्याने सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. मात्र, दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर ट्रेलरचालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला. त्याचा शोध ग्रामीण पोलीस घेत असून त्यांनी ट्रेलर पोलीस ठाण्यात लावला आहे मृत दत्ताच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ७ वाजता शोकाकुल वातावरणात पालोद येथे अंतिम संस्कात करण्यात आले पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय आगे व रवींद्र आंबेकर करीत आहेत.












